८ मार्च २०२४....जागतिक महिला दिनानिमित्त....
विकसित भारतासाठी महिलांचे उच्चशिक्षिण महत्त्वाचे........
८ मार्च २०२४ - या वर्षीचा जागतिक महिला दिन हा महाशिवरात्री या हिंदू संस्कृतीतील महत्त्वाच्या सनादिवशी साजरा होत आहे. यावेळच्या महिला दिनाचे थीम 'इन्स्पायर इन्क्लुजिव्हनेस ' असे असून , 'महिलांसाठी गुंतवणूक करा व विकासाला चालना द्या ' हे प्रमुख उद्दिष्ट आहे. परंतु केवळ एक दिवसासाठी महिला दिन साजरा करून हे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकणार नाही तर यासाठी सात्यत्याने प्रयत्न करावे लागतील. देशाच्या विकासासाठी स्त्रीयांचे उच्चशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी मुली व महिलांना योग्य सोयी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. उच्चशिक्षित स्त्रिया त्यांच्या कुटूंबाच्या विकासात तसेच देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. महिलांसाठी शिक्षण, संशोधन, आरोग्य, कौश्यल्य विकास, नवनिर्मिती, उद्योजगता इत्यादी मध्ये गुंतवणूक केल्यास समाजाचा विकास वेगवान होईल असा संदेश या महिला दिनाच्या उद्दिष्टातून मिळतो.
महिलांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक , राजकीय आणि इतर सर्व क्षेत्रातील कामगिरीबद्दल कृतज्ञता आणि त्यांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव झाला पाहिजे . प्राचीन भारतातील आणि इतिहासातील अनेक महिलांनी आपल्या जिद्दीने , धैर्याने, बुद्धिमत्तेने आणि संघर्षाने समाजाला मोठा आदर्श निर्माण करून दिला आहे.महिलांचे जीवन नेहमीच आव्हानाने भरलेलं असते. घरची जबाबदारी, सामाजिक अपेक्षा आणि कामाचा ताण यांच्यात समतोल साधण्याचा त्या प्रयत्न करत असतात. असे असूनही आज विविध क्षेत्रात स्त्रियांनी स्वताची उल्लेखनीय कामगिरी दाखवली असून आपले कौशल्य सिद्ध केले आहे. याच यशस्वी महिला, इतर महिलांसाठी प्रेरणा देत आहेत . शिक्षणामुळे स्त्रियांमध्ये त्यांच्या हक्काची, कर्तव्याची आणि जबाबदारीची व्यवस्थित जाणीव होते.
परंतु आजही महिलांना काही प्रमाणात असमानता आणि अत्याचाराचा सामना करावा लागतो. लिंगभेद, शिक्षणाचा अभाव, आर्थिक असुरक्षा , घरगुती हिंसा , अत्याचार अश्या विविध समस्यांमुळे अनेक स्त्रियांचा विकास आजही खुंटलेला दिसतो. आजही स्त्रियांना शिक्षण , नोकरी तसेच सुरक्षित वातावरणा बाबत संघर्ष करावा लागतो . काही स्रिया आजही त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत. म्हणून महिलांच्या समान हक्कासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. महिलांना समाजात सन्मान आणि समान वागणूक देण्यासाठी सर्वांचे एकमत पाहिजे. प्रत्येक स्त्री आणि पुरुषाची हि जबाबदारी आहे. सर्वांनी महिलांना अधिक सुरक्षित आणि समान वागणूक दिली तर सक्षम समाज निर्मिती होऊ शकते. २०४७ साला पर्यंत भारत देश पूर्णपणे विकसित करण्याचे स्वप्न सर्व भारतीयांचे आहे. यासाठी उच्चशिक्षित स्त्रियांचे योगदान खूप महत्त्वाचे ठरणार असून त्यासाठी उच्चशिक्षणातील स्त्रियांचे प्रमाण वाढले पाहिजे. या उच्चशिक्षित स्त्रियाच, दुर्बल व अशिक्षित स्त्रियांच्या समस्या जाणून घेवू शकतात व त्यांना प्रगतीचा मार्ग दाखवून सक्षम बनवू शकतात.
इन्स्पायर इन्क्लुजिव्हनेस हे थीम डोळ्यासमोर ठेवायचे असेल तर लिंगभेदाच्या चाकोरीबाहेर जावून स्त्रियांना सर्व क्षेत्रात समान संधी देवून त्यांना समाविष्ट करून घ्यावे लागेल. त्यासाठीच स्त्रियांसाठी गुंतवणूक करावी लागेल आणि तरच त्यांचे सक्षमीकरण होईल आणि देश विकसित होण्यास मदत होईल.....
प्रा. डॉ. गजानन माळी
Comments
Post a Comment