कोरोना : विश्वव्यापक साथीचा कारक विषाणू
डिसेंबर २०१९ च्या अखेरीस चीनच्या वूहान शहरामधून
सुरवात करून जगभर पसरत असणारा आणि ज्याची प्रत्येकाने धास्ती खाल्ली आहे असा
विषाणू म्हणजे ‘कोरोना’. जागतिक आरोग्य संघटनेनं नुकतेच ‘कोविड-१९’ या कोरोना
विषाणूमुळे होणाऱ्या आजाराच्या साथीला ‘विश्वव्यापक
साथीचा रोग ’ म्हणून जाहीर केले. आज या रोगास प्रतिबंध करण्यासाठी साथीचे रोग प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी
करावी लागली. अद्याप तरी या रोगास ठोस असे औषध किंवा लस उपलब्ध नाही. परंतु
विज्ञानातील प्रगतीमुळे आणि तज्ञांच्या अनुभवाने
यावर लवकरच उपाय निघेल असा आशावाद सर्वांनाच आहे. सर्व स्तरावर त्यासाठी अहोरात्र प्रयत्न
सुरु आहेत. त्यामुळे या साथीची नोंदही इतिहास जमा होणार असली तरी आज मात्र हे एक
नैसर्गिक संकट आपल्यासमोर उभे आहे.
विषाणू म्हणले कि
माणसाच्या मनात नक्कीच भीती निर्माण होते कारण आतापर्यंत आपणास अनेक प्रकारच्या
विषाणूजन्य आजारांना तोंड द्यावे लागले आहे. विषाणूजन्य आजारांना औषधांच्या खूप
मर्यादा आहेत. सध्या आपणास ज्या विषाणूशी
संघर्ष करावा लागत आहे तो सर्वसामान्यांमध्ये नवीन कोरोना विषाणू म्हणूनच प्रसिद्ध
झाला आहे. याच विषाणूची जैवशास्त्रीय माहिती या लेखातून करण्याचा हा प्रयत्न.
कोरोना विषाणू
हे काय निसर्गामध्ये पूर्णपणे नवीनच आहेत किंवा ते एकाच प्रकारचे आहेत असे म्हणता
येत नाही. विषाणूंच्या एका मोठ्या वर्गातील हे विषाणू असून त्यांचे अस्तित्व
मनुष्य तसेच उंट, गायी,मांजर,वटवाघूळ इत्यादी सस्तन प्राण्यांमध्ये तसेच कांही
पक्ष्यांमध्ये ( कोंबड्या ) असल्याचे यापूर्वीच दिसून आले आहे. या विषाणूंच्या
एकूण सात प्रजाती आहेत. त्या म्हणजे – 229E, NL63, OC43, HKU1, MERS - CoV (Middle
East Respiratory Syndrome – CoV), SARS-CoV
(Severe
Acute Respiratory Syndrome–CoV)
आणि SARS-CoV-2
किंवा
COVID-19).यापैकी पहिल्या चार प्रजाती नेहमीच्या सामान्य सर्दीशी
संबंधित आहेत परंतु उरलेल्या तीन (MERS-CoV, SARS-CoV आणि SARS-CoV-2 )मुळे श्वसनसंस्थेचे
न्युमोनिया सदृश्य गंभीर आजार निर्माण होतात. नैसर्गिकरीत्या प्राण्यांच्या शरीरामध्ये
असणारे हे विषाणू मानवी शरीरामध्ये प्रवेश करतात व नंतर त्यांचे मानसामानसा मध्ये संक्रमण
सुरु होते. यापैकी MERS-CoV या प्रजातीमुळे २०१२ साली ‘ मिडल इस्ट रेस्पायरेटरी सिंड्रोम ’ या
न्युमोनिया सदृश्य आजाराची ची साथ आली
होती तर २००३ साली SARS-CoV या विषाणूमुळे ‘सिव्हीयर अक्यूट रेस्पायरेटरी सिंड्रोम’ या
आजाराची ची साथ आली होती. MERS-CoV चे विषाणू उंटा च्या
शरीरातून मानवी शरीरात आले तर SARS-CoV हे विषाणू सिव्हेट कॅट (
एक प्रकारची मांजराची जात ) मधून मानवात आले असे तज्ञांचे मत आहे.
सध्या आपण ज्याच्याशी मुकाबला करत आहोत त्या
विषाणूना SARS-CoV-2 आणि या आजाराला COVID-19 असे संबोधण्यात आले आहे. SARS-CoV-2 या विषाणूमुळेसुद्धा श्वसनसंस्थेचाच
आजार होतो. या विषाणूला सुरवातीला नवीन कोरोना विषाणू असे नाव दिले गेले परंतु याची जनुकीय संरचना SARS-CoV या विषाणूशी खूपच मिळती
जुळती होती आणि त्यामुळे ‘आंतरराष्ट्रीय विषाणू वर्गीकरण समिती’ ने या विषाणूला SARS-CoV-2 असे नाव दिले आणि जागतिक आरोग्य संघटनेने या आजारास COVID-19 असे नाव दिले.
इन्फ़्ल्युएंझा गटातील विषाणूप्रमाणेच हे विषाणू देखील
गोलाकार असून त्यांचा सरासरी व्यास सुमारे १२० नॅनोमिटर इतका असतो. परंतु या
नवीन SARS-CoV-2 कोरोना विषाणूचा व्यास
तुलनेने खूपच मोठा म्हणजे ४०० ते ५०० नॅनोमिटर आहे. या विषाणूंच्या संरचनेमध्ये
मध्यभागी एकपदरी अखंड साखळीच्या स्वरूपातील आरएनए चे जनुक असते. इतर विषाणूंच्या
तुलनेत या जनुकाची लांबी बरीच मोठी आहे. त्याच्याभोवती जनुकाला संरक्षित ठेवणारे प्रथिनांचे
आवरण असते ,याला ‘कॅप्सिड’ असे
म्हणतात. पुन्हा या ‘कॅप्सिड’ भोवती, मुख्यता स्निग्ध पदार्थांपासून बनलेले एक लवचिक
बाह्यआवरण असते, त्याला ‘इनव्हलप’ असे म्हणतात. या बाह्यआवारणामधूनच प्रथिनांचेच टोकदार
असे काही स्पाईक्स बाहेर डोकावलेले असतात. हे स्पाईक्स आतील बाजूने निमुळते तर
बाहेरील बाजूने फुगीर व मोठे असतात.
त्यामुळे हे विषाणू इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली अगदी मुकुटा सारखे दिसतात आणि
म्हणूनच त्यांचे कोरोना असे आहे. (कोरोना हा मुळ लॅटिन भाषेतील शब्द असून त्याचा
अर्थ क्राऊन म्हणजे मुकुट असा आहे) या स्पाईक्सच्या सहाय्यानेच हे विषाणू मानवी
शरीरातील यजमान पेशीना चिकटतात व त्यामध्ये प्रवेश करतात. महत्वाचे म्हणजे २००३
सालच्या साथीतील SARS-CoV पेक्षा SARS- CoV-2 विषाणूंमध्ये यजमान
पेशीला चिटकून त्यामध्ये प्रवेश करण्याची क्रिया खूप मोठ्या गतीने होते.तसेच SARS-CoV च्या साथीमध्ये मृत्यूचा
दर १० % होता व ERS-CoV च्या साथीमध्ये मृत्यूचा दर ४० % पेक्षा जास्त होता. या तुलनेत SARS- CoV-2 मुळे मृत्यूचा दर खूप कमी आहे.
कोरोनाच्या साथीची वूहान मध्ये सुरवात झाल्यानंतर
सुरवातीला असे वाटले होते कि हा विषाणू सामुद्रिक पदार्थाच्या बाजारातून मनुष्य
शरीरामध्ये असेल. याच ठिकाणी ससे, साप
इत्यादी प्राणी देखील विकले जात होते.त्यामुळे सापांच्या शरीरातून सुद्धा हा
विषाणू मानवी शरीरात आला असेल असे अनुमान काढले होते. परंतु नंतरच्या अभ्यासातून
असे सिद्ध झाले आहे कि हे विषाणू वटवाघुळातून मानवी शरीराकडे आले आहेत. तथापि, साथ
पसरण्याचे मुख्य कारण हे मानसा-मानसामधील जवळचा संपर्क व वस्तू. हा आजार
श्वसनसंस्थेशी संबंधित असल्याने बोलणे, शिंकणे किंवा खोकणे या प्रक्रियेतून जे
चिकट सूक्ष्मथेंब बाहेर पडतात त्यातून हे विषाणू पसरतात. ज्या वस्तूंवर किंवा
जागेवर हे सूक्ष्मथेंब पडतात व तेथील
धुळीबरोबर चिकटतात. त्याच्या संपर्कात जर निरोगी व्यक्ती आली तर ती लगेच बाधित होते. असे कण हातामार्फत डोळे, तोंड किंवा नाकाद्वारे श्वसन संस्थेत
प्रवेश करतात. एका अभ्यासगटानुसार, हे विषाणू रुग्णाच्या विष्ठेमध्ये सुद्धा असतात
व ते संडासाच्या भांड्यातून सुद्धा पसरतात. परंतु याबाबत अजून संशोधन सुरु आहे. चीन
आणि लंडन मध्ये नुकत्याच जन्मलेल्या बाळाला ३० तासाच्या आत विषाणूंची बाधा झालेली
सुद्धा नोंद आहे. त्यांच्या मातांना विषाणूंची बाधा झाली होती परंतु त्याबाबत
अद्याप असे निश्चित सांगता येत नाही कि हि बाधा मातेच्या गर्भातच नाळेतून झाली कि
जन्मल्यानंतर झाली. तज्ञांच्या मते बाधित मातेच्या संपर्कामुळेच नवजात बालकाला बाधा
झाली असेल.
या रोगाचा अधिशयन काळ म्हणजे विषाणूंचा शरीरात प्रवेश झाल्यानंतर
लक्षणे दिसण्यासाठीचा कालावधी २ ते १४ दिवसांचा असतो, परंतु सरासरी ५ दिवसात
लक्षणे दिसू लागतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग , वृद्ध व्यक्तीमध्ये हा आजार
जास्त बळावतो. चीन आरोग्य विभागाच्या अहवालानुसार ८१% रुग्णांमध्ये हा आजार सौम्य
तर १४ % रुग्णांमध्ये तीव्र स्वरूपाचा होता. केवळ ५ % रुग्णामध्ये आजाराने गंभीर
रूप धारण केले होते. मृत्यूचा दर केवळ २.५ ते ५ % होता. या साथीमध्ये तुलनेने लहान
मुले कमी प्रमाणात बाधित झाली होती तसेच त्यांच्या मध्ये सौम्य लक्षणे दिसत होती. बरे
होण्याचे प्रमाणही चांगले होते. एकूण रुग्णांपैकी केवळ २.४ % रुग्ण १८ वर्षा खालील
वयाचे होते. मध्यम वयोगटातील ( ३० वर्षा पेक्षा जास्त ) रुग्णांची संख्या मात्र
खूप मोठी होती. यामध्ये ताप, कोरडा खोकला, थकवा आणि श्वासोच्छवासास त्रास हि
प्रमुख लक्षणे असतात. याव्यतिरिक्त डोकेदुखी, घसा खवखवणे, नाकात दाह , पचनसंस्था
बिघडणे इत्यादी लक्षणेही दिसू शकतात.
रुग्णांच्या रक्तचाचणी मध्ये पांढऱ्या पेशींचे तसेच लीम्फोसाईटसचे प्रमाण
कमी होते तर काही विशिष्ठ प्रकारच्या प्रथिनांचे उदा. प्रोकॅल्शिटोनीन ,
सी-रीयाक्टीव प्रोटीन चे प्रमाण वाढते. निदान करण्यासाठी रुग्णाच्या रक्तातील सिरम
मध्ये ‘आयजी-जी’ व ‘आयजी-एम’ या घटकांची
तपासणी केली जाते. तसेच रुग्णाच्या घश्यातील आणि फुफुसातील श्राव स्वॅबच्या सहाय्याने
घेवून त्यामध्ये असणाऱ्या SARS-CoV-2 विषाणूंचे जनुक ओळखले जाते आणि निदान निश्चित केले जाते. यासाठी ‘पॉलीमरेज
चेन रीयाक्शन’ या अत्याधुनिक तंत्राचा वापर केला जातो. या चाचणीचा अहवाल दोन
दिवसात प्राप्त होतो.
Comments
Post a Comment